Author: pcfsm.it@gmail.com

  • Kokan: कोकणात महायुतीत बंडखोरी, शिवसेना आमदाराच्या लेकीचा अर्ज; तटकरेंच नाव घेत थेट सुनावलं

    रत्नागिरी: विधान परिषदेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत कलह अखेर चव्हाट्यावर आला आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली जुवेकर यांनी बंडखोरी करत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या बंडखोरीमुळे या निवडणुकीतील रंगत अधिकच वाढली आहे.

    यावेळी जुवेकर म्हणाल्या, ‘सध्या त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असून, पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ अद्याप जोडलेला नाही; मात्र, इथला महायुतीचा उमेदवार कोण असेल, याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मला, विकास गोगावले यांना किंवा अन्य कोणत्याही शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली तरी चालेल; पण ती शिवसेनेलाच मिळायला हवी. आमचा तटकरे यांच्या नावाला तीव्र विरोध आहे. कोकणात शिवसेनेची ताकद अधिक असताना राष्ट्रवादीला ही जागा देण्यावरून शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

    कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे पारडे जड आहे; परंतु महायुतीमध्ये बंडखोरी निर्माण झाल्यामुळे गुंता वाढत चालला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी घेट लढत असली, तर महायुतीतील उमेदवारीचा तिढा कायम राहिल्यास बंडखोरीचा फायदा कोणाला होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

    “राष्ट्रवादी काँग्रेसने कोकणात कायम शिवसैनिकांवर ८८ अन्याय केला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत अनिकेत तटकरे यांचा प्रचार करणार नाही. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांत शिवसेनेची ताकद आणि मतदार जास्त आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा, अशी आग्रही मागणी आहे.”

    – जुईली जुवेकर, अपक्ष उमेदवार

    बाळ माने उद्या अर्ज दाखल करणार

    दरम्यान, महाविकास आघाडीनेदेखील ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी माजी आमदार बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते असलेले माने सोमवारी (१ जून) सकाळी ११ वाजता त्यागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.

  • Nagpur News: तीन खोल्यांचे घर अन् २५ हजारांचे वीज बिल, स्मार्ट मीटरचा ग्राहकांना झटका, संताप अनावर..

    नागपूर : महिन्याला तीन ते चार हजार रुपये येणारे वीज बिल मे महिन्यात तब्बल २५ हजार ५३० रुपयांचे आले. एवढे बिल पाहून ग्राहकाला धक्काच बसला. स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिलात मोठी वाढ झाल्याचा संताप आता ग्राहकांकडून होऊ लागला आहे.PauseMute

    शंकरनगर भागात राहणारे जगजित सिंग यांचे तीन खोल्यांचे घर आहे. त्यांच्या पत्नीच्या नावाने वीज मीटर आहे. त्यांना दर महिन्याला सरासरी चार हजाराच्या जवळपास बिल येत होते. मात्र, यंदाचा मे महिन्याचा उन्हाळा त्यांच्यासाठी चांगलाच तापदायक ठरला. वीज बिल पाहताच त्यांना मोठा ‘शॉक’ बसला. मे महिन्यात त्यांना १२५० युनिट जळाल्याचे बिल मिळाले. महावितरण स्लॅबनुसार बिल आकारते. १०० युनिटपर्यंत ३.९६ रुपये प्रती युनिट आकारले जाते. तर स्लॅबनुसार ते वाढत जाते.

    १००० युनिटसाठी तब्बल १७.५३ रुपये प्रती युनिट दर आकारले जाते. त्यामुळे सिंग यांना १२५० युनिटचे तब्बल २५ हजार ५३० रुपयांचे बिल पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांचे ४०० ते ५०० युनिटपर्यंत कधीच बिल गेले नव्हते. त्यामुळे एवढे युनिट जळल्याचे त्यांना नवल वाटले. मात्र,एवढा भुर्दंड कसा सोसविणार, असा सवाल त्यांचा आहे.

    एका खोलीसाठी तब्बल ८ हजार तर तीन खोल्यांसाठी २५ हजार ५३० रुपयांचे बिल मिळाले आहे. वीज निर्मितीचा खर्च हा २.१५ रुपये होत असताना आपल्याकडे अमाप बिल आकारल्या जात आहे. स्मार्ट मीटरचा हा घोळ असून सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अन्याय आहे. – जगजित सिंग, सामाजिक कार्यकर्ते.

    तक्रार केली, कर्मचारी पाहून गेले

    सिंग यांच्याकडे स्मार्ट मीटर लावले आहे. बिल खूपच जास्त आल्याची तक्रार त्यांनी महावितरणच्या शंकरनगर कार्यालयात केली आहे. तेथील अधिकारी-कर्मचारी सिंग यांच्या घरी येऊन तपासणी करून गेले. अद्याप काही सूचना आली नसल्याचे त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या घराच्या वरच्या माळ्यावर आणखी एक खोली आहे. त्याचे स्वतंत्र मीटर आहे. या खोलीचेही बिल ८ हजार रुपये आल्याचे सिंग यांनी सांगितले.

    अनेकांच्या तक्रारी

    स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिलात वाढ झाल्याचे सिंग यांनी सांगितले. तर जीएसटी विभागाचे माजी सहायक आयुक्त संजय थूल यांना सुद्धा मे महिन्याचे बिल तब्बल २९ हजार ८३० रुपये आले. बऱ्याच ग्राहकांचा विजेचा वापर जास्त नसूनही म्हणजे दर महिन्याला ५०० ते ६०० रुपये बिल येणाऱ्यांना ३५०० ते ४००० हजाराच्या जवळपास बिल येऊ लागले आहेत. स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिलात वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या आहेत.

  • Sangali Election : आटपाडीत दहा जेसीबीमधून मिरवणूक; नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत भाजपचा झेंडा

    आटपाडी : नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आज तुफान जल्लोष केला. आमदार गोपीचंद पडळकर, जय देशमुख आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ध्वनियंत्रणेच्या आवाजात ठेका धरला. तसेच दहा जेसीबीतून विजयी उमेदवारांची जंगी मिरवणूक काढली. 

    नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम जाधव यांनी ११५४ मतांनी विजय मिळवला, तर १७ पैकी भाजपचे सात नगरसेवक निवडून आले. निकालानंतर आटपाडी शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर धाव घेतली.

    Atpadi Nagar Panchayat First Election

    मेढ्यात भाजपची सरशी; पण शिवसेनेने झुंजविले, नगराध्‍यक्षपदी रूपाली वारागडेंचा अवघ्‍या ४६ मतांनी निसटता विजय!

    प्रचंड संख्येने जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची तुफान आतषबाजी आणि गुलालाची मुक्त उधळण करून आनंदोत्सव सुरू केला. काही क्षणांतच आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांचे पुत्र जय देशमुख, समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर दाखल झाले.

    त्याचवेळी विजयी उमेदवार उत्तम जाधव आणि नगरसेवक कार्यालयासमोर आले. तिथे ध्वनियंत्रणेच्या आवाजात सर्वांनीच ठेका धरला. कार्यकर्त्यांनी नेतेमंडळींना खांद्यावर उचलून जल्लोष केला, तर नेतेमंडळींनी शड्डू ठोकून आनंद साजरा केला. यानंतर तहसील कार्यालयासमोरील मुख्य चौकातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी १० ते १२ जेसीबी आले होते.

    Prerna Balkawade : भगूरमध्ये सत्तांतर! राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे नगराध्यक्षपदी; शिवसेनेच्या २० वर्षांच्या सत्तेला सुरुंग

    त्यावर विजयी उमेदवारांना बसवून ध्वनियंत्रणेच्या दणदणाटात मुख्य चौकातून मिरवणूक काढली. ही मिरवणूक नगरपंचायतीसमोर आल्यावर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

    पहिल्याच निवडणुकीत नगरपंचायतीमध्ये भाजपचे कमळ फुलल्याचा आनंद कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून मतदारांनी भाजपकडे सत्ता दिली आहे. मतदारांची विकासाची अपेक्षा नक्की पूर्ण करू.

    – आमदार गोपीचंद पडळकर

  • Kolhapur Engineer End Life : वडिलांचा कारखाना, भाऊ परदेशात नोकरीला; एम.टेक विशालचा टोकाचा निर्णय, MIDC रोडवर धक्कादायक घटना

    Kolhapur Tragic News : कोल्हापूर येथील गजानन महाराजनगरमधील तरुण अभियंत्याने येथील लक्ष्मी टेकडीजवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विशाल हरिष शेळके (वय २९) असे त्याचे नाव आहे. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्याशेजारी हा प्रकार घडला. त्याचे एम.टेकपर्यंत शिक्षण झाले होते. उच्चभ्रू घरातील विशालच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.

    कागल पोलिसांनी दिलेली माहिती अशी, औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्याशेजारी झाडाजवळ हा प्रकार घडला. पोलिसांना घटनास्थळी मोटारसायकल व मोबाईल आढळला. विशालच्या वडिलांचा शिवाजी उद्यमनगरमध्ये विजय इंटरप्रायजेस हा कास्टिंग कारखाना आहे. तो वडिलांना व्यवसायात मदत करीत होता. त्या विशालचा मोठा भाऊ परदेशात असतो. त्याच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ, विवाहित बहीण, आजी असा परिवार आहे.

    कागल ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला, तेव्हा विशालच्या मित्रांनी रुग्णालय आवारात गर्दी केली होती. विशालचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. दोरीचे दुसरे टोक जमिनीलगत होते. त्यामुळे घातपाताचा संशय होता; मात्र तपास आणि उत्तरीय तपासणीमध्ये आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना सांगितले.

    Kolhapur Engineer End Life in kagal midc

    Kolhapur Theft Case : ‘पोलिसाच्या घरातील तिजोरी अर्धा किलोमीटर शेतात नेत फोडली; लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पैसे चोरले, कोल्हापुरातील घटना

    रात्री दहापर्यंत गप्पा…

    विशाल रात्री दहापर्यंत कुटुंबीयांसोबत गप्पा मारत बसला होता. तो रात्री अकरा वाजता स्वतःच्या खोलीत झोपायला जातो, असे सांगून निघून गेला. सकाळी त्याची आई उठविण्यास गेली असताना तो खोलीत नव्हता. तो जिमला गेला असे समजून घरचेही त्यांच्या कामात व्यस्त होते. अचानक कागल पोलिस ठाण्यातून फोन आल्यानंतर भीतीचे रूपांतर अखेर दुःखात झाले.

  • Pimpri Chinchwad Education: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘बालभारती’ची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या दारी; पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत वितरणाला सुरुवात

    पिंपरी: ‘बालभारती’कडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके आलेली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सोमवारपासून (ता.८) शुक्रवारपर्यंत (ता. १२) ही पुस्तके शाळेत विनामूल्ये वितरीत केली जात आहेत. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे, शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही होत आहे.

    Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..

    पुस्तकांच्या वितरणासाठी आकुर्डीतील वसंतदादा पाटील महापालिका शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील मनपा शाळा, पिंपरी वाघेरे ही वितरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा, शासकीय शाळा, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पाठ्यपुस्तक असावे, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

    खासगी शाळांबाबत दुजाभाव

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने महानगरपालिका शाळांना विभागवार पाठ्यपुस्तकांच्या वाटपाचे व्यवस्थित नियोजन केले आहे. मात्र खासगी शाळांसाठी ना गाव, ना विभाग, ना केंद्र अशी परिस्थिती असल्याची तक्रार एका खासगी शाळेतील शिक्षकांनी केली. शिक्षण विभागाने खासगी शाळांना पाठवलेल्या वेळापत्रकात बुधवार (ता.१०) ते १२ जूनमध्ये पाठ्यपुस्तके वितरीत करण्याचा तारखा दिल्या आहेत. पण, केंद्राची नोंद केलेली नाही.

    Mahabaleshwar Khed Bridge: सह्याद्रीत उभा राहिला ‘मिनी सी-लिंक’! महाबळेश्वर-खेड जोडणारा भव्य पूल वाहतुकीसाठी सज्ज, प्रवास होणार सुसाट, कधी खुला होणार?

    खासगी अनुदानित शाळांमधील स्वयंअर्थसहाय्यित तुकड्यांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्ये पाठ्यपुस्तके वितरीत केली जाणार नाहीत, याची संबंधित शाळांनी नोंद घ्यावी. सर्व मुख्याध्यापकांनी नियोजित वेळापत्रकानुसार पाठ्यपुस्तकांचा ताबा घेऊन विद्यार्थ्यांना वेळेत वितरण करावे.

    – संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

  • उद्योगपतींची कर्जे सरसकट माफ; मग शेतकऱ्यांवर कर्जमाफीच्या अटींचे ओझे का?

    मंचर : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याऐवजी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ११) मंचर येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफी निर्णयाची होळी करून निषेध नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांनी राज्यशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

    पिंपळगाव चौकातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा प्रांत कार्यालयावर गेला. अग्रभागी प्रकाश कोळेकर,संतोष पवार,काळूराम सरोदे,वनाजी बांगर,प्रवीण पाचरणे,गुलाब कुरकुटे,संजय पालेकर,वसंत वाडेकर,मारुती इष्टे, गणेश भंगे आदी शेतकरी होते. प्रवेशद्वारा समोर झालेल्या सभेत बांगर म्हणाले राज्यसरकारने दिलेली कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. अटी शर्ती मान्य करून सरसकट कर्ज माफी द्यावी.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्यांना ५० हजार रुपयाऐवजी १ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावे. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अमोल वाघमारे,वैजंती कोऱ्हाळे, राजू घोडे,प्रमोद खांडगे,तुकाराम गावडे,वंदना वाघचौरे यांनी भाषणे झाली.

    उद्योगपतींची कर्जे माफ, मग शेतकऱ्यांना अटींचे ओझे का?

    केंद्र सरकारने मोठ्या उद्योगपतींची कर्जे ‘राईट ऑफ’ करताना कोणत्याही अटी-शर्ती लादल्या नाहीत. मग रात्रंदिवस कष्ट करून देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विविध अटी का घातल्या जात आहेत, अनेक उद्योगपतींनी राज्य व देशातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. त्यांच्याविरोधात सरकारने नेमकी कोणती कठोर कारवाई केली, हे आधी जनतेसमोर स्पष्ट करावे.

    प्रभाकर बांगर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

  • Hello world!

    Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!