
Kolhapur Tragic News : कोल्हापूर येथील गजानन महाराजनगरमधील तरुण अभियंत्याने येथील लक्ष्मी टेकडीजवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विशाल हरिष शेळके (वय २९) असे त्याचे नाव आहे. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्याशेजारी हा प्रकार घडला. त्याचे एम.टेकपर्यंत शिक्षण झाले होते. उच्चभ्रू घरातील विशालच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.
कागल पोलिसांनी दिलेली माहिती अशी, औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्याशेजारी झाडाजवळ हा प्रकार घडला. पोलिसांना घटनास्थळी मोटारसायकल व मोबाईल आढळला. विशालच्या वडिलांचा शिवाजी उद्यमनगरमध्ये विजय इंटरप्रायजेस हा कास्टिंग कारखाना आहे. तो वडिलांना व्यवसायात मदत करीत होता. त्या विशालचा मोठा भाऊ परदेशात असतो. त्याच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ, विवाहित बहीण, आजी असा परिवार आहे.
कागल ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला, तेव्हा विशालच्या मित्रांनी रुग्णालय आवारात गर्दी केली होती. विशालचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. दोरीचे दुसरे टोक जमिनीलगत होते. त्यामुळे घातपाताचा संशय होता; मात्र तपास आणि उत्तरीय तपासणीमध्ये आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना सांगितले.

रात्री दहापर्यंत गप्पा…
विशाल रात्री दहापर्यंत कुटुंबीयांसोबत गप्पा मारत बसला होता. तो रात्री अकरा वाजता स्वतःच्या खोलीत झोपायला जातो, असे सांगून निघून गेला. सकाळी त्याची आई उठविण्यास गेली असताना तो खोलीत नव्हता. तो जिमला गेला असे समजून घरचेही त्यांच्या कामात व्यस्त होते. अचानक कागल पोलिस ठाण्यातून फोन आल्यानंतर भीतीचे रूपांतर अखेर दुःखात झाले.
Leave a Reply